गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा

गोव्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गोवा सरकार लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचं सावंत यांनी जाहीर केलं. या योजनेनुसार लाभार्थ्यांच्या खात्यात 9 सप्टेंबरपासून 3000 रुपयांची रक्कम जमा केली जाईल.

प्रमोद सावंत यांच्या माहितीनुसार गोवा सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्याासठी 5 सप्टेंबरपासून अर्ज करता येतील. हे अर्ज पंचायत कार्यालय आणि आमदारांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

पणजीमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटल की ही योजना 2022 च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा भाग होती. त्यावेळी लोकांना प्रत्येक वर्षी तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देण्याचं आश्वासनं दिलं होतं.

प्रमोद सावंत म्हणाले, की 9 सप्टेंबरपासून लाभार्थ्यांच्या खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. या वित्तीय मदतीमुळं पात्र लाभार्थी योजनेनुसार तीन एलपीजी गॅस सिलेंडरसाठीचा खर्च करु शकतात. गोवा राज्याचा नागरिक यासाठी अर्ज जमा करु शकतो, त्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. सांवत यांच्या माहितीनुसार या योनजेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे बँक पासबुक, आधार कार्ड आणि मतदानओळखपत्र आवश्यक असेल, या सर्व कागदपत्रांच्या प्रती जमा कराव्या लागतील.

दरम्यान, पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2027 मध्ये गोवा विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातील घडामोडी वाढल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 40 पैकी 27 जागा जिंकत गोव्यात सत्ता मिळवली होती. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *