ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अण्णा हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा त्रास जाणवत होता. उपचार सुरू असूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, अहवालांच्या आधारे पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे. अण्णांची प्रकृती बिघडली असली तरी सध्या ती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अण्णांचे वय आणि प्रकृतीतील अशक्तपणा लक्षात घेता डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवले आहे. अण्णांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि अनुयायांमध्ये चिंता निर्माण झाली असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलंय?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही अण्ण हजारे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. “ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बरी नसल्याचं वृत्त काळजी करण्यासारखं आहे. अण्णा तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. आमच्या सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,” असं रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
