ओरिजनल पैठणी ओळखणे आता सोप्पे होणार, साडीवर येणार बारकोड; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणीबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. बाजारात पैठणीच्या किंमती लाखांच्या घरात आहे. प्रत्येक महिलेला आपल्या कपाटात एकतरी पैठणी हवी अशी इच्छा असते. त्यामुळं पैठणी खरेदी करताना त्या अत्यंत जागरूक असताता. बाजारात ओरिजनल पैठणीच्या ऐवजी सेमी पैठणी किंवा डुप्लीकेट पैठणीदेखील विकली जाते. मात्र आता बनावट पैठणीच्या विक्रीला चाप बसणार आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

ग्राहकांना आता सेमी पैठणी आणि ओरिजनल पैठणीतील फरक स्पष्ट होणार आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यासाठी मोठा निर्णय घेतला असून ग्राहकांना दोन्हीतील फरक समजून पैठणी खरेदीपासून त्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. राज्याचे स्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे महत्त्वाची माहिती दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता सावकारे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी त्यासाठी एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. खऱ्या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय कोणत्या गावात कोणत्या कारागिरांना ही पैठणी तयार केलेले याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार आहे.

पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे. तो एक कलेचा भाग आहे. एक पैठणी तयार करायला 15 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो त्यामधून सुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी आहे, असं संजय सावकारे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *