मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 11 व्यांदा उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदोलकांना मुंबईत जमण्याचं आवाहान केलं आहे. गनिमी कावा पद्धतीने आता मुंबईत जाऊन राहा असं जरांगेंनी आंदोलकांशी संवाद साधताना म्हटलं आहे. आज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांनी 12 सप्टेंबर रोजी मुंबईत आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आतापर्यंत थेट मोर्चा घेऊन मुंबईत धडकलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते हळूहळू मुंबईत जमणार आहेत.
पोलिसांनी उचलून नेलं तर…
“आम्ही मुंबईला जाणार आहोत. राज्यातील मराठा समाजाला सांगतो. मुंबईत पाहुणे, मित्र यांच्याकडे जाऊन राहा. फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. मराठे मुंबईत आले हे कुणालाही कळायला नको. आजपासून 12 दिवस मुंबईला जाऊन राहा. पोलिसांनी उचलून नेलं तर तिथे राहा. तिथेही चांगली सोय आहे. जामीन घेऊ नका. कुणाला पोलिसांनी नेलं तर मी बघून घेतो,” असं जरांगेंनी म्हटलं आहे.
झोपून राहणे आणि रेटून खाणे असं…
उपोषणासंदर्भात बोलताना, “उपोषण मी सोडणार नाही. मी मुंबईत जिथे आंदोलनाला जाईन तिथे तुम्ही मी आल्यानंतर या,” असं जरांगेंनी म्हटलं आहे. मुंबईकरांची गैरसोय होईल याबद्दल प्रश्न केला असता जरांगेंनी, “त्यांची काय कोंडी होणार आहे?” असा सवाल केला. “सर्व मागण्यांची अंमलबजावणी केल्यानंतरच उपोषणावर तोडगा निघेल. आमची दारं चर्चेसाठी खुली आहेत. त्ंयाच्या दारात आम्हाला जायचं नाही. तिथे मुंबईत चर्चा होऊ शकत नाही. इथेच चर्चा होईल. झोपून राहणे आणि रेटून खाणे असं आमच्या मुंबईतील आंदोलनाचं स्वरूप राहील,” असं जरांगेंनी म्हटलं आहे.
गणपतीत आंदोलनावरुनही सुनावलं
सरकारने चर्चेसाठी संपर्क केलेला नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे. तसेच गणेशोत्सवामध्ये मुंबईत आंदोलन करण्यावरुन होणाऱ्या टीकेलाही जरांगेंनी उत्तर दिलं आहे. “कोणतीही चर्चा झालेली नाही.12 तारखेला आम्ही ठरवू मुंबईला कधी जायचं. गणेशोत्स सांगू नका आमच्या एवढं गणपती कुणीही बसवत नाही. ते आम्हाला गणपती शिकवतात आमच्याएवढं देव देव कुणीही करत नाही,” असं जरांगे म्हणालेत. सरकारकडून, “माझ्याशी कुणाचीही चर्चा झालेली नाही,” असं म्हटलं आहे.
संवैधानिक म्हणजे काय हे फडणवीसांना माहिती
मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलताना, “त्यांच्यासाठी दारे खुली आहेत. आम्ही म्हणलोच नाही तुम्ही चर्चेला या. आमच्याकडे सगळं मोकळं आहे. संवैधानिक म्हणजे काय हे त्यांचं त्यांना माहीत. संवैधानिक असेल म्हणूनच हैद्राबाद गॅझेटचा जीआर निघाला असेल. जेलमध्ये जाणारे लोक भाजपात आले की संवैधानिक मग जेलमध्ये जात नाही. ते दोन संविधान चालवतात. पण आपले पोरं मुंबईला जाण्यासाठी तयार राहा,” असं जरांगे म्हणालेत.
5 ते 50 लाख पोरं मुंबईत गेले पाहिजे
आंदोलनासाठी हळू हळू मुंबईत जा असं जरांगेंनी समर्थकांना सुचवलं आहे. “मुंबईला जाणाऱ्यांनी हळू हळू पुढे चालावे. माझ्यासोबत जास्त कुणी राहू नका. पोलिसांना त्रास देऊ नका. फडणवीस-शिंदे यांच्याकडे आपल्याला पहायचं आहे. 12 तारखेच्या पुढे तुम्ही मुंबईला निघा. आपलेही काही घरं तिथे असतील. फक्त आझाद मैदान आणि वर्षाकडे जाऊ नका. मुंबईत 1 ते 2 लाख घरं मराठ्यांची असतील. त्यांच्याकडे जाऊन थांबा. इथली गर्दी कमी झाली तरी चालेल. पोलिस तिथे काही जास्त नाही. उगीच इथे गर्दी करून काही फायदा नाही. 6 दिवसांत पाहुणे शोधा आणि हळू हळू मुंबईकडे निघा बाकी आम्ही बघून घेतो. 5 ते 50 लाख पोरं मुंबईत गेले पाहिजे,” असं जरांगेंनी मुंबईत जमण्याचं आवाहन करताना म्हटलं आहे.
शिंदेंनी आमच्याशी 3 वर्ष गद्दारी का केली?
“12 ते 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत उपोषणासाठी परवानगी मागायला सांगा. त्यांनी परवानगी दिली तरी उपोषण करणार नाही दिली तरी करणार. 58 लाख नोंदी आहेत तर मग आमच्याशी शिंदेंनी आमच्याशी 3 वर्ष गद्दारी का केली? पक्ष सोडून त्यांच्याशी तर केलीच पण मग आमच्याशीही केली. जे प्रमाणपत्र रद्द केले ते रद्दच होत नाहीत. मग न्यायालयात का पळवता? आमचं हक्काचं असून आम्हाला कोर्टात का पळवता?” असा सवाल जरांगेंनी केला. “हळू हळू बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईला निघा. मुंबईत जाऊन गनिमी कावा पद्धतीने राहा,” असं जरांगे म्हणालेत.
