मुंबईतील भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीत 22 ऑगस्ट रोजी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती ठाण्यात झाली असती. मात्र वेळीच मुस्लिम तरुण गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. मध्यरात्रीनंतरचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला असून या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नवा धडा लिहिला गेला आहे. ठाण्यातील मुंब्रा शहराने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम एकता आणि बंधुत्वाची शिकवण दिली आहे. गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचा चाक तुटल्याने मूर्तीला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी मुंब्र्यातील मुस्लिम तरुणांनी धाव येत तब्बल चार तास अथक प्रयत्न करत 20 फूट उंचीच्या गणरायाच्या मूर्तीला सुरक्षित ठेवले.
नेमका हा प्रकार घडला कुठे?
मुंब्र्यातील शंकर नगर परिसरात मार्कंडेय सेवा संस्थेची सुमारे 20 फूट उंच गणेशमूर्ती तयार करण्यात आली होती. ही मूर्ती भिवंडीतील पद्मा नगर येथील गणेश मंडपाकडे घेऊन जात असताना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दाभोळकर नाक्यावर ट्रॉलीचं चाक अचानक तुटलं. ट्रॉली असंतुलित होऊन पलटण्याचा आणि गणेशमूर्तीचे नुकसान होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
मुस्लिम तरुण मदतीला धावले
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुंब्र्यातील आरिफ सय्यद उर्फ पापा, बासित शेख, शाहू यांच्यासह अनेक मुस्लिम तरुण मदतीसाठी धावून आले. या तरुणांनी जवळपास चार तास ट्रॉलीला आधार देऊन धरून ठेवले. मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही यासाठी हे मुस्लिम चार तास तिथेच उभे होते. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने गणेशमूर्ती सुरक्षित खाली उतरवण्यात आली. नवीन ट्रॉली आल्यानंतर मूर्ती पुन्हा त्यावर स्थापित करण्यात आली आणि पहाटे 4 वाजता गणरायाचा प्रवास पुन्हा सुरू झाला.
त्या तरुणांचे आभार, स्थानिक आमदाराची पोस्ट
स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. “काल मध्यरात्री मुंब्र्याहून भिवंडीला जाणाऱ्या भिवंडीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती ट्रॉलीचा टायर पंक्चर झाल्यामुळे कलंडला. तो पडण्याच्या अवस्थेत आला असतानाच तेथील तरुणांनी त्या गणपतीची मूर्ती धरून ठेवली. क्रेन बोलावून गणपतीची मूर्ती सरळ केली अन् पुन्हा दुसऱ्या ट्रॉलीवर चढवली. हे सगळं करायला चार ते पाच तास लागले. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपली मूर्ती घेऊन भिवंडीला रवाना झाले. हीच भारताची… हीच महाराष्ट्राची ओळख आहे. इथे जाती-धर्म कधीही आड येत नाही. आड येतात ते फक्त द्वेष पसरवणारे राजकारणी! त्यांना हा धडा आहे की, मुंब्रा हा नेहमी सामाजिक एकतेसाठीच ओळखला जातो आणि यापुढेही ओळखला जाईल. मी ज्या तरूणांनी हा गणपती परत आपल्या जागी प्रतिष्ठापना करण्यासाठी जाणार होता, त्या जागी सुखरूप पोहोचवला, त्याबद्दल त्यांचे आभार!” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
