अंधेरीतील डॉ. मिलिंद चितळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या हिल्स अँड ट्रेल्सच्या 60 पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. हा ग्रुप अचानक निर्माण झालेल्या नेपाळमधील पूरस्थितीच्या वेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावरच होता, असे चितळे यांच्या टीमतर्फे सांगण्यात आले आहे. या ग्रुपसोबत वेंकटराम अन्नमदेवरा आणि अनघा अन्नमदेवराही प्रवास करत होते. त्यांची कन्या आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर तन्वी हिने tanvimakesvideos या इन्स्टा अकाऊण्टवरुन अपडेट्स दिले आहेत. आई-वडील सुखरुप असतील आणि नक्की सुरक्षित परत येतील, अशी खात्री व्यक्त करतानाच तन्वीला अश्रू अनावर झाले.
तन्वी काय म्हणाली?
“जे कोणी मला विचारत आहेत की मी कशी आहे, त्यांना सांगू इच्छिते, की माझी NEET PG ची परीक्षा होती.” त्यासाठीचा थंब प्रिंट दाखवत तन्वी म्हणाली, “तीन तासांच्या त्या परीक्षेतला मला वाटतं दीड तास तर मी फक्त रडतच होते. काही वेळा प्रश्न वाचणंही कठीण जात होतं, कारण डोळ्यांत अश्रू साठले होते. जेव्हा NEET PG ची स्क्रीन समोर असते, जिथे ते प्रश्न दिसतात… तिथे दोन फोटो असतात, त्यातला एक ॲडमिट कार्डवरचा फोटो असतो. तो फोटो माझ्या बाबांनी काढला होता. त्यामुळे NEET PG ची परीक्षा आणखीनच कठीण वाटली. आणि मला माहित होतं की, बाबांची इच्छा आहे की मी ही परीक्षा द्यावी.” असं तन्वी सांगते. नेपाळच्या महापुरात तिचे आई वडील बेपत्ता आहेत.
तन्वीला अश्रू अनावर
“मला बाबांसाठी हे करायचं आहे. माझ्या आई-वडिलांसाठी हे करायचं आहे. मी तिथे बसले, ती परीक्षा पूर्ण दिली. आणि हो, मला वाटतं परीक्षेपेक्षाही कठीण गोष्ट म्हणजे… परीक्षेच्या आधी सकाळी, आई नेहमी ‘दही-साखर’ द्यायची, चमच्याने दही-साखर भरवायची. आणि बाबा मला ‘ऑल द बेस्ट, तन्वी’ म्हणायचे. पण या परीक्षेत तसं काहीच झालं नाही. त्यामुळे त्यांनी परत आलंच पाहिजे. त्यांना परत यावंच लागेल. ते परत न येण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी परत आलंच पाहिजे. कारण त्यांना… आईला मला पुन्हा दही-साखर भरवायची आहे. प्लीज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्लीज. बस…” असं म्हणत भावनावश तन्वीने व्हिडिओ थांबवला.
