आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीडमध्ये भा.शि.प्र.सं. अंबाजोगाई संचालित भेल संस्कार केंद्र आयोजित “अमृत दौड” (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 47 वर्षीय महिलेने आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. केवळ सहभागच घेतला नाही तर महिनेने चक्क साडीत आणि अनवाणी पायाने मॅरेथॉन धावत प्रथम क्रमांक पटकवला आणि 3 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले.
बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 47 वर्षीय समाबाई रणवीर हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्वयंपाकाचे काम करतात. घरची आर्थिक परिथिती बेताची असल्याने समाबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी आणि आपल्या संघर्षाला बळ देण्यासाठी त्यांनी ‘अमृत दौड’ या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी कोणतेही महागडे स्पोर्ट्स शूज किंवा कसलेही धावण्याचे प्रशिक्षण नसताना केवळ अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर समाबाईंनी स्पर्धेत सहभाग घेत ती जिंकली. समाबाईंची ही कहाणी अनेक तरुणपिढीला प्रेरणा देणारी आहे. समाबाईंनी ही स्पर्धा जिंकल्यावर त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस म्हणून 3 हजार रुपये देण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल मात्र मागे हटणार नाही असा संदेश समाबाईंनी दिला. सध्या समाबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या या कामगिरीनंतर त्यांच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच त्या अनेकांसाठी प्रेरणादायी सुद्धा ठरल्या आहेत.
