पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. त्याला लागून असलेल्या समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही प्रणाली जमिनीकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं असताना एकीकडे महाराष्ट्रात मात्र पावसाने उघडिप दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारली असली आहे. घाटमाथ्यासह राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून,मुझफ्फराबाद, हरदोई, गोरखपुरस, पटना, बंकुरा कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. उत्तर प्रदेशापासून कमी दाब क्षेत्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. सौराष्ट्र परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर ते 1500 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती.
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांता ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याबरोबरच विजांसह पाऊस होणार आहे. त्यामुळं या जिल्हांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ऑगस्टमध्ये पावसाची तूट
जुलैमध्ये बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालींमुळे मुसळधार पावसाची नोंद होऊन काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान घरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या
सुरुवातीपासून या भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाल्या असल्या तरीही राज्यावर त्याचा फारसा प्रभाव नसल्याने केवळ काही भागात वादळी पावसाची नोंद झाली. या दरम्यान उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मात्र, सर्वदूर पावसाचा अभाव असल्याने तसेच उष्ण आणि दमट वातावरणात वाढ झाल्याने या प्रदेशात उकाड्यातही वाढ झाली.
