रविवारी मुंबई विमानतळाने अनोखे रक्षाबंधन अनुभवले. अलका कीर्तीरामन आणि राकेश मेहता या भावाबहिणीने कैलास मानसरोवर यात्रेला एकत्र सुरुवात केली. मात्र अलका यांची प्रकृती बिघडल्याने त्या वरपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर २६ ऑगस्टला नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे शक्य तितक्या लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले. त्यात अलका आणि राकेश यांचा वेगवेगळा प्रवास सुरू झाला. या वेगवेगळ्या प्रवासाला रविवारी विमानतळावर पूर्णविराम मिळाला आणि अलका यांनी त्यांच्या बंधूंना राखी बांधून हा क्षण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
कैलास दर्शनावेळी महापुराचा अंदाजही नव्हता
रविवारी नेपाळची राजधानी काठमांडूहून नेपाळ एअरवेज आणि इंडिगोच्या विमानांनी सुमारे ९६ यात्रेकरून मुंबईत परतले. यामध्ये कपोल सोशल ग्रुप आणि इशा फाऊंडेशनचे यात्रेकरू होते. यातील बहुसंख्य मुंबईतील असल्याचे सांगण्यात आले. हे यात्रेकरू २६ ऑगस्टला कैलास दर्शनानंतर खाली उतरले, तोवर त्यांना नेपाळमध्ये ओढवलेल्या महापुराच्या आपत्तीचा अंदाजही नव्हता. कपोल सोशल ग्रुपचे ९२ यात्रेकरू २७ ऑगस्टला तिमुरे चेकपोस्टवर पोहोचणार होते. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर सहल व्यवस्थापकाने तातडीने निर्णय घेत, हिल्सा सीमेपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.
स्नेही सुखरुप दिसताच अश्रू अनावर
हिल्सा येथून हेलिकॉप्टरने सिमिकोट, तेथून लहान विमानाने नेपाळगंज आणि मग तिथून काठमांडूपर्यंत त्यांनी प्रवास केला. यासाठी प्रत्येकी ८० हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागले. या काळामध्ये राज्य किंवा केंद्र सरकारने चौकशीही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. याच गटातील वालिया कुटुंबीयांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, स्नेही डफली वाजवत विमानतळावर दाखल झाले होते. हार, पुष्पगुच्छ, मिठाई वाटून, ‘हर हर महादेव’चा घोष करत त्यांनी आनंद व्यक्त केला. परतीच्या प्रवासादरम्यान नेपाळमधील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहिल्यानंतर, आपण किती मोठ्या संकटातून बचावलो याची जाणीव झाल्याचे यशोदा वालिया यांनी सांगितले. आपले नातेवाईक सुरक्षित आहेत, याची माहिती विमानतळावर त्यांना न्यायला आलेल्या नातेवाईकांना होती. तरीही आपली व्यक्ती सुखरूप समोर दिसताच, त्यांना अश्रू आवरले नाही.
दरच्या २१ वर्षीय आनंदिता गोरे या ईशा फाऊंडेशनसोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या होत्या. त्यांचे आई-वडील विमानतळावर त्यांना न्यायला आले होते आणि आई-वडिलांना पाहता क्षणीच त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. २६ ऑगस्टला आनंदिता यांनीच त्यांच्या आईना पूरस्थितीची माहिती देत, आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. तेव्हापासून त्यांची आई सुमेधा गोरे लेकीची वाट पाहत होत्या. ईशा फाऊंडेशनसोबत या यात्रेसाठी गेलेल्या डॉ. सुनीता जैन यात्रा पूर्ण करून खाली उतरल्या, त्यानंतर त्यांना या सगळ्या घडामोडींची माहिती मिळाली. त्यावेळी फोनला रेंज मिळाल्याने, त्यांनी प्रथम घरी ख्यालीखुशाली कळवली. घरच्यांशी संपर्क झाल्याने एक चिंता मिटली होती. मात्र नंतर प्रवास कसा करायचा हा प्रश्न होता. तोही सुटल्याने त्या वेळेत मुंबईत परत आल्या. रस्त्यांची झालेली अवस्था, व्हिडीओंचा मारा, नातेवाईक, स्नेह्यांचे सातत्याने येणारे फोन, चौकशी या सगळ्याचा ताण या यात्रेकरूंवरही आला आहे.
