झेरॉक्स दुकानात 3500 SIR फॉर्म; दुय्यम प्रती काढल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा, पाच बीएलओ निलंबित

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेंतर्गत जमा करण्यात आलेले मतदारांच्या मूळ अर्जांची झेरॉक्स दुकानात भाजप पदाधिकाऱ्याकडून दुय्यम प्रत काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकारी सूरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पाच ‘बीएलओं’चे निलंबन करण्यात आले आहे.

खारघर सेक्टर-१९मधील एका झेरॉक्स दुकानात निवडणूक आयोगाच्या हजारो गोपनीय एसआयआर अर्जांच्या दुय्यम प्रती काढण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी तिथे भेट दिली. त्यावेळी भाजपचा स्थानिक पदाधिकारी सूरज पाटील हा मतदारांच्या हजारो मूळ अर्जांच्या प्रती काढताना आढळला. यावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन तणाव निर्माण झाला. खारघर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सूरज पाटील याला ताब्यात घेतले आणि ३,४०४ अर्ज जप्त केले. त्यानंतर काही वेळातच सूरज पाटील हा संशयास्पदरीत्या पोलिस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी बालेश भोजने यांनी केला. त्यावरून ‘उबाठा’च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या आदेशानुसार, नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने जप्त केलेल्या अर्जांची तपासणी केली. ते १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मूळ अर्ज असल्याचे निष्पन्न झाले. या अर्जांवर मतदारांचे मूळ रंगीत फोटो, भरलेले तपशील आणि संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आढळून आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *