सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सावंतपूर येथील अंकुर बबन सुतार या तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला आणि त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी घडली आहे. मात्र, या घटनेनं पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
अंकुर सुतार व मयत तरुणी हे एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. यामुळे अंकुरचे व तरुणीचं एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. याचाच फायदा घेत आरोपी अंकुर हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मयत तरुणी ही पलूस येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, तर अंकुर हा कोल्हापूर येथे ज्वेलरीच्या दुकानात कामाला होता. यामुळे तरुणी ही आरोपीला दाद देत नव्हती. त्यामुळे आरोपीने मागील 15 दिवसांपासून मयत युवतीला वारंवार फोन करणे, मेसेज करून, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्यावर प्रेम कर,’ अशा आशयाचे संदेश पाठवणे आणि फोन करून तिच्यावर प्रेमसंबंधासाठी दबाव आणल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
आरोपीच्या अशा सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेमुळे मयत तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सावंतपूर परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तर आरोपी अंकुर सुतार याच्याविरुद्ध युवतीच्या मृत्यूस कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
भावाने स्वत:ला संपवलं
सण उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी, पण याच सणाच्या दिवशी एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. रक्षाबंधनानिमित्त सकाळीच बहिणीने मोठ्या प्रेमाने भावाच्या हातावर राखी बांधली, त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली. भावानेही बहिणीचं औक्षण करून तिला नेहमी सोबत राहण्याचं वचन दिलं. मात्र, हा आनंद काही तासांपेक्षा जास्त टिकू शकला नाही. संध्याकाळच्या सुमारास याच भावाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
