शनिवार 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस असून त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्तरावर जबरदस्त कामगिरी करणाऱ्या नागपूरकर धावपटू गौरव खोडतकर या एथलीटची संघर्षमय कहाणी हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दिवसभर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचं आणि सकाळ-संध्याकाळ मैदानावर घाम गाळायचा ध्येय एकच पंधराशे मीटर शर्यतीत राष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवायचं. नागपूरकर धावपटू गौरव खोडतकरनं नुकत्याच वारंगल येथे पार पडलेल्या इंडियन अथॅलेटिक्स सिरीज 13मध्ये पंधराशे मीटर शर्यत 3 मिनिट 47.90 सेकंद वेळ नोंदवत जबरदस्त कामगिरी करताना दुसरा क्रमांक पटकावला. त्याने केलेली ही चमकदार कामगिरी महाराष्ट्रात पंधराशे मीटर शर्यतीत फ्युचर स्टार धावपटू तयारीत असल्याचे संकेत आहे.
दिवसभर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचं आणि सकाळ-संध्याकाळ मैदानावर घाम गाळायचा आणि हे सगळं करताना ध्येय एकच ते म्हणजे पंधराशे मीटर शर्यतीत राष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवायचं. गौरवची घरची परिस्थिती अतिशय बेताची, वडील ड्रायव्हर म्हणून काम करायला जातात तर आई लोकांकडे घरकाम करायला जाते. अशात घरच्यांना आर्थिक हातभार करायचा आणि खेळातही नाव काढण्याकरता गौरवची संघर्षमय धडपड सुरू असते. कमालीची बाब म्हणजे कसून सराव करणारे राष्ट्रीय स्तरावरील धावपटू शारीरिक क्षमता जपून ठेवण्याकरता डायट, फिटनेसवर लक्ष ठेवतात, काळजी घेत असतात. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या गौरवाला मात्र कसून सराव केल्यानंतरही रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो.
