बुधवारी हिमनद्यांचे कडे कोसळून मध्य नेपाळच्या रसुवा आणि अन्य भागांसह तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर जलप्रलय आला. तसेच विध्वंसानंतर शुक्रवारी बचावकार्याला आणखीन गती मिळाली. अनेक शहरं, गावं, रस्ते, पूल तसेच जलविद्युत प्रकल्पांना जलप्रलयाचा तडाखा बसला आहे. नेपाळमध्ये सर्वत्र हाहाकार उडाला असून पूल ओसरल्यावर आता जागोजागी चिख्खल झालेला आहे. या महाभयंकर प्रलयामुळे नेपाळमध्ये सुमारे दोन हजार जण तर तिबेटमध्ये 558 जण बेपत्ता आहेत. तर नेपाळमधील मृतांची संख्या 579 वर पोहोचली आहे. महापुराने घडवलेल्या विध्वंसासह प्रतिकूल परिस्थितीशी बचावपथकांची झुंज सुरू असताना नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती धोका व्यवस्थापन नाधिकरणाने (एनडीआरआरएमए) बुन्हा महापुराचा इशारा दिला. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा घाबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेपाळ-तिबेट सीमेवरील विध्वंसक जलप्रलयाने हाहाकार माजवला असताना नेपाळ सरकारने दुसऱ्या प्रलयाचा इशारा दिला आहे. हिमकडे कोसळून जलपातळी वाढत असल्याने पुन्हा जलप्रलयाचा धोका वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, नेपाळमधील 579 आणि तिबेटमधील 5 मृतांसह प्रलयबळींची संख्या शुक्रवारी 584 वर पोहोचली असून, नेपाळमध्ये 1924 जण अद्याप बेपत्ता आहेत.
मुंबईतला 60 जणांचा ग्रुप बेपत्ता :
मुंबईतून नेपाळला पर्यटनासाठी गेलेला जवळपास 60 जणांचा ग्रुप बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी झालेल्या महाप्रलयानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यात महाराष्ट्रातील नागरिक तसेच काही बिगर निवासी भारतीय नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून बेपत्ता नागरिकांचे अनेक नातेवाईक नेपाळच्या दिशेने रवाना होत आहेत. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने विशेष मदत कक्ष सुरू केला आहे. नेपाळमधील परिस्थितीवर आणि स्थानिक सूत्रांवर लक्ष ठेवून आहोत. महासंघाचे स्वयंसेवक मदतीसाठी तयार आहेत. प्रभावित भाविकांचा शोध घेणे, बचावकार्य आणि मदत पोहोचवण्यासाठी संबंधित प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रातील 404 जण अडकल्याचा अंदाज :
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील 200 ते 404 नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातील सुमारे 125 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. यातील काहीजण हे परतीच्या प्रवासात आहेत, मात्र सीमेवरील रस्ते आणि इमिग्रेशन पोस्ट वाहून गेल्यामुळे नेपाळ आणि चीन सरकारकडून परतीचा पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे परतीच्या प्रवासात काही अडचणी येत आहेत. नेपाळमध्ये गेलेले 105 जण आतापर्यंत मायदेशात परतले आहेत.
