मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका, दुधाच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ होणार

ऐन सणासुदीच्या दिवसांत दुधाच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. दुधाचा दर थेट नऊ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना ऐन गौरी-गणपतीच्या सणांलाच बजेट सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

धाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुधाचा सध्याचा घाऊक दर प्रतिलिटर 93 रुपयांवरून 102  रुपये करण्यात येणार आहे. मुंबईत हे नवे दर 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत लागू राहणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंग यांनी दिली.

बैठकीत दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतींबरोबरच दाणा, तूरचुणी, चणाचुणी आदी पशुखाद्यांच्या दरात 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच चारा, पेंड आदींच्या किमतीतही वाढ झाल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगण्यात आले. या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून हा दर प्रतिलिटर 9 रुपयांनी वाढवून 102 रुपये करण्यात आला असून, दूध उत्पादकांना वाढत्या खर्चातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई दुग्ध उत्पादक संघाकडून स्पष्ट करण्यात आले.

कांदाही महागला

यंदा श्रवणामध्येच कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरमध्ये आवक आणखी कमी होईल. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला कांदा ऑक्टोबरपर्यंत पुरवावा लागणार असून दिवाळीत विक्रमी दरवाढीची शक्यता असल्याने कांदा आणखी रडवणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलैमध्ये 15 ते 26 रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर 32 ते 42रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात 60 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. लसणाचे दरही घाऊक बाजारात 50 ते 150 वरून 70 ते 170 रुपयांवर पोहोचले असून किरकोळ बाजारात लसूण 140 ते 320 रुपये किलो दराने विकला जात आहे.

Add Zee News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *