मध्यरात्री साधला डाव, सुरगाण्यात वृद्ध दाम्पत्याला निर्घृणपणे संपवलं, नातवासह नातसून पोलिसांच्या ताब्यात

सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात मंगळवारी मध्यरात्री घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू आणि नातसुनेला ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सखाराम गावित (वय ६६) आणि बायजाबाई गावित (वय ६३, रा. केळुणे) हे घरात झोपलेले असताना मंगळवारी (दि. २५) रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी (दि. २६) सकाळी उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. पोलिस पाटील बापूराव भोये यांनी सुरगाणा पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे, पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.

ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

…या कारणामुळे टोकाचे पाऊल

तपासादरम्यान पोलिसांनी मृतांचे नातू देवीदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देवीदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनीही संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत दाम्पत्य दररोज मद्यपान करून शिवीगाळ व वाद घालत असल्याने घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत होते. रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी हत्या केल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले.

ओझरमधील कासागल्ली परिसरात एका तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. विनोद विष्णू शेंद्रे (वय ३४, रा. बाजारपेठ, ओझर) असे तरुणाचे नाव आहे. कासागल्ली येथे अमोल पावटे यांच्या भाड्याने दिलेल्या घरात विनोद शेंद्रेचा मृतदेह आढळला. बुधवारी (दि.२६) रात्री साडेदहा वाजेपासून ते गुरुवारी (दि.२७) सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या काळात दोरीने विनोदचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज आहे. विनोद हा मूळचा कळमगाव, तालुका यवतमाळ येथील असून, तो ओझर येथे एका किराणा दुकानात काम करीत होता. या प्रकरणी मित्र रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनोदसोबत खोलीत राहणारा त्याचा मित्र परागंदा झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *