डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा जवळील मोकळ्या जागेत अनेक वर्ष एक विक्रेता बर्फाच्या लाद्या डोंबिवली शहर परिसरातील हाॅटेल्स, रसवंती गृह, बार आणि इतर व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विक्री करतो. हे बर्फाचे साठा केंद्र अलीकडे कचरा, दुर्गंधी, मलनिस्सारणाचे पाणी यांनी वेढलेले असते. या घाणीच्या भागातील बर्फ विक्रेता डोंबिवली शहर परिसराला पुरवतो. हा बर्फ विविध प्रकारच्या पेयांमधून डोंबिवलीकर गिळत असतात, अशा तक्रारी आता नागरिकांकडून वाढू लागल्या आहेत.
आपण गिळत असलेला बर्फ कचरा, दुर्गंधी, घाणीच्या भागातील आहे याची माहिती नसल्याने डोंबिवली शहर परिसरातील नागरिक दररोज हा बर्फ विविध प्रकारची पेय, खाद्यान्नांमधून गिळत असतो. अशाप्रकारचा घाणीतील बर्फाचे नियमित सेवन करून आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती शहरातील काही आहारतज्ज्ञांनी व्यक्त केली.
बर्फ साठा केंद्र
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील बाजीप्रभू चौकात पूर्वीचे चंदू पॅलेस आणि अन्नपू्र्णा हाॅटेलसमोरील भागात एका इमारतीचा आडोसा घेऊन मोकळ्या जागेत मागील तीस वर्षापासून एक विक्रेता बर्फ विक्री करतो. हे बर्फ साठा केंद्र आता बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा प्लाझाजवळील मोकळ्या जागेत उघड्यावर आहे. याठिकाणी पहाटेपासून बर्फाच्या लाद्या आईस फॅक्टरीमधून आणून उतरविल्या जातात. याठिकाणचा बर्फ डोंबिवली शहर परिसरातील हाॅटेल्स, बार, रसवंती गृह, लग्न, हळदी आणि विविध प्रकारच्या उत्सवी कार्यक्रमांच्या ठिकाणी मागणीप्रमाणे पोहचविला जातो. वर्षभर हे बर्फ साठा केंद्र सुरू असते.
जीवाशी खेळ
मागील अनेक वर्ष या बर्फ साठा केंद्रात भुसा, घायपातचा अधिकचा वापर करून बर्फ दिवसभर न वितळता सुरक्षित राहील याची काळजी विक्रेता घेत होता. आता घायपत पोती, प्लास्टिक खालीवर टाकून त्यावर बर्फाच्या लाद्या उघड्यावर ठेवल्या जातात. पाटकर प्लाझाच्या बाजुला असलेल्या या बर्फ साठा केंद्राजवळ कचरा, दुर्गंधी, घाण असे चित्र आहे. या इमारतीच्या भुयारी भागात मलनिस्सारणाचे पाणी तुंबलेले असते. त्याचा दर्प या भागात सतत वाहत असतो. त्याच्या झळा या बर्फ साठा केंद्राला बसतात. आपण उघड्यावर बर्फ ठेऊन विक्री करतो. आपल्या आजुबाजुला खूप कचरा, घाण आहे याची जाणीव असुनही दिवसाढवळ्या हा घाणीच्या भागातील बर्फ विविध व्यापारी आस्थापनांना विक्री केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीता हा सगळा प्रकार पाहणारे नागरिकही व्यक्त करतात.
हजारो डोंबिवलीकर मागील अनेक वर्ष हा उघड्यावरील बर्फ विक्रीचा व्यवहार बघतात. ज्यांना येथील घाणीची माहिती आहे. ते डोंबिवलीकर नागरिक कधीही हाॅटेल्स, बार किंवा रसवंती गृहात गेल्यानंतर बर्फ न टाकता पेयपान करतात. आता लाकडाच्या वखारी कमी झाल्या आहेत. त्यामुळे पुरेसा भुसा बर्फ विक्रेत्यांना मिळत नाही. यापूर्वी बर्फ लाकडाच्या भुशाने वेढलेला असायचा. त्यावर घायतपताची पोती टाकून तो सुरक्षितपणे ठेवला जात होता. आता भुसा नसल्याने घायपत पोती आणि प्लास्टिक टाकून बर्फ सुरक्षित ठेवला जातो. मागणीप्रमाणे त्याची विक्री केली जाते, असे प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगतात.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातील उघड्यावरील बर्फ विक्री केंद्राची माहिती देऊन त्यांना योग्य समज देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
