सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालून जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी भव्य ‘महाजनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पोलीस, बँका आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांच्यासह प्रमुख बँक अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर गुन्हेगारांच्या अत्याधुनिक आणि अत्यंत क्लिष्ट कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नुकत्याच घडलेल्या एका सायबर गुन्ह्यात ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत मुंबई आणि तामिळनाडूतील खात्यांमार्फत तब्बल १,४०० विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. सायबर गुन्हेगारीचे हे वाढते स्वरूप चिंताजनक असून, नागरिकांची सतर्कता हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
