स्वयंपाकघर अभावी रत्नागिरीतील ४०० शाळांमध्ये पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर; उघड्यावर, जुन्या पडक्या खोल्यांमध्ये स्वयंपाक; विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ७१२ शाळांपैकी तब्बल ४०० शाळांकडे स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या केवळ २ हजार ३१२ शाळांमध्ये किचन शेडची सुविधा आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पोषण आहार उघड्यावर अथवा जुन्या, पडक्या खोल्यांमध्ये शिजवला जात असल्याचे चित्र आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये स्वयंपाकघराचीच सुविधा नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज आवश्यक प्रथिने मिळावीत यासाठी १०० ग्रॅम तांदूळ व पूरक पदार्थ, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ व पूरक धान्य दिले जाते. मात्र, अनेक शाळांमध्ये धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने तसेच स्वयंपाकासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने अन्नाच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *