वय २७, गुन्हे मात्र ३० हून अधिक; गुंड ओमकार भोसलेला राजस्थानमधून अटक

सराईत गुन्हेगार ओमकार भोसले (२७) याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. ओमकार आणि त्याच्या साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ओमकारविरोधात यापूर्वीही हत्येचा प्रयत्न, मारामारी, धमकावणे, शस्त्रास्त्र बाळगणे यांसह ३० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. असे असतानाही त्याच्या समाजमाध्यमावरील खात्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र आणि चित्रफीत दिसून येतात. त्यामुळे त्याला राजकीय आश्रय आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

कॅडबरी जंक्शन येथील एका टॉवरमध्ये राहणाऱ्या ओमकार भोसले आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी २२ ऑगस्ट रोजी क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी ओमकार आणि त्याच्या साथीदारांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ओमकार आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान ओमकार राजस्थानमधील रिंगस परिसरात लपून बसल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक राजस्थानमध्ये रवाना झाले. रिंगस पोलिसांच्या मदतीने ओमकारला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रात्री त्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

ही कारवाई सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस हवालदार शैलेश शिंदे, सुमित मधाळे तसेच पोलीस शिपाई अरविंद शेजवळ आणि तानाजी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. ओमकारविरोधात ३० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. असे असतानाही त्याच्या समाजमाध्यमावरील खात्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र आणि चित्रफीत दिसून येतात. काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागांत फलकही लावण्यात आले होते. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या व्यक्तींना राजकीय आश्रय मिळतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *