भुलेश्वरचा राजा’ ही मुंबईतील २२ फूट उंच गणेश मूर्ती आगमन मिरवणूक सुरु असताना कोसळून झालेल्या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातात मृत्युमुखी पडलेला ३३ वर्षीय संकेत नेवशे हा मंडळाचा मुख्य आधारस्तंभ आणि व्यवस्थापक होता. संकेतचा भाऊ सिद्धेश नेवशे याच्या मनात कोणाविषयी राग नाही, त्याला कोणालाही जबाबदार ठरवायचं नाही, उलट शेवटच्या क्षणीही बाप्पाला सावरण्यासाठी सहज पुढे सरसावलेल्या आपल्या भावाची दृश्यं त्याच्या डोळ्यासमोरुन हटत नाहीयेत.
शेवटचा व्हिडिओ समोर
शनिवारी रात्री ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मूर्ती कोसळली तेव्हा संकेत तिच्या खाली दबला गेला. घटनास्थळावरील व्हिडिओ नंतर पाहिल्यावर त्याच्या कुटुंबीयांना समजलं की, शेवटच्या क्षणी संकेतने नेमके काय केले होते. त्याने त्या भव्य मूर्तीला दोन्ही हातांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ पाहून नेवशे कुटुंबीयही भावूक झालं.
“ती गोष्ट समजल्यावर मला आश्चर्य वाटले. ती मूर्ती इतकी सुंदर, अन् भव्य होती की आपण तिला एक इंचही हलवू शकत नाही, हे ध्यानात येतं. संकेतने मात्र पुढे जाऊन ती दोन्ही हातांनी धरण्याचा प्रयत्न केला. आमचा संकेत असाच होता. ऊर्जेने भरलेला आणि कोणालाही आधार द्यायला पुढे सरसावणारा” असे संकेतचा भाऊ सिद्धेश नेवशे याने ‘मुंबई मिरर’ला सांगितले.
पहिल्यांदाच गणेशमूर्तीची उंची वाढवली
संकेतसाठी या वर्षीची मूर्ती विशेष जिव्हाळ्याची होती. मंडळातर्फे परंपरेने साधारण १६ फूट उंचीच्या मूर्ती आणल्या जात असत. शिल्पकार अनिकेत देसाई यांच्याशी सुरुवातीला १८ फूट उंचीच्या मूर्तीबाबत चर्चा झाली होती, परंतु संकेतने त्यापेक्षा मोठी मूर्ती असावी असा आग्रह धरला. अखेरीस ती मूर्ती साधारण २२-२३ फूट उंचीची बनली.
