मराठी भाषेच्या अभ्यासक, व्याकरण तज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 21 जून 1925 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्यांचा जन्म झाला. मराठी व्याकरण, शुद्धलेखन, भाषाविज्ञान आणि मुद्रितशोधन क्षेत्रात त्यांनी फार मोठं काम केलं आहे.
यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा जॉन रुबेन असं होतं. त्या जन्माने ज्यू (यहुदी) समुदायातील होत्या. 1950 मध्ये नाशिकमधील अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी जेरुशा यांचा आंतरधर्मीय विवाह झाला. त्यानंतर त्यांनी नाव बदलून ‘यास्मिन शेख’ असे ठेवले. त्यांनी नाव बदललं तरी आपला धर्म बदलला नाही. यास्मिन शेख यांनी तब्बल 34 वर्षे शाळा-महाविद्यालयात अध्यापन केलं. त्या मुंबईच्या एसआयईएस महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख होत्या. आयएएस उमेदवारांना यास्मिन शेख यांनी व्याकरण शिकवले.
वयाच्या 100 व्या वर्षीही सक्रिय
यास्मिन शेख यांनी मराठी शब्दलेखनकोश (2007, सुधारित आवृत्ती 2015), मराठी लेखन मार्गदर्शिका आणि इतर व्याकरणविषयक विपुल लेखन केलं. वयाच्या 100 व्या वर्षीही त्या सक्रिय होत्या. 2025 मध्ये यास्मिन शेख यांना ‘मराठी भाषा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
