कचोरीत आढळल्या उंदराच्या डझनभर लेंड्या, मुलांनी 2 कचोऱ्या खाल्ल्यानंतर उघडकीस आला संताजनक प्रकार

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळविरोधात मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गंत हॉटेल, बेकरीतील अस्वच्छता असो किंवा अन्नपदार्थांमधील भेसळ असो या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र राज्यातील काही हॉटेलमध्ये अजूनही खाद्यपदार्थात भेसळ व स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका ग्राहकाने कचोरीत चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा दावा केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशा प्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

‘मी पाच कचोरी घेऊन गेलो होतो. त्या पाचही कचोऱ्यांमधून उंदराच्या लेंड्या आढळल्या. त्यानंतर मी त्यांना हे पार्सल आणून दिले त्यांनी ते फेकूनही दिले. त्यानंतर दुकानदाराने माफी मागितली आहे. आमच्याकडून चुकी झाली, असंही त्यांनी म्हटलं. पण तरीही काही झालं तरी आम्ही तक्रार करणारच,’ असं ग्राहकाने म्हटलं आहे.

या प्रकारामुळे संबंधित दुकानात स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, तसेच अन्नपदार्थांची हाताळणी आणि साठवणूक योग्य पद्धतीने केली जाते का, याबाबत तपासणीची मागणी होत आहे. आता अन्न व औषध प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

मिठाई दुकानात डिस्प्ले परिसरात झुरळ

बोरीवलीतील सुरभी मिठाईच्या दुकानातून अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत चिंता वाढवणारा व्हिडिओ समोर आला आहे. दुकानातील मिठाई ठेवण्यात येणाऱ्या डिस्प्ले परिसरात चक्क झुरळ फिरताना आढळून आले आहे. ग्राहकांना सहज दिसणाऱ्या ठिकाणीच झुरळ फिरत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *