बाईकवरून जाताना अचानक तोल गेला, मागून येणाऱ्या बसची धडक; तरुणीचा जागीच मृत्यू

नागपुरात शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एका पाच वर्षीय चिमुकलीसह तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानेवाडा परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर कामठी मार्गावर ई-बाईकवरील तरुणी दुभाजकावर आदळून मनपाच्या इलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून अपघातांचा तपास सुरू आहे.

मानेवाड्यात भरधाव कारची चिमुकलीला धडक

मानेवाडा परिसरातील महाकाली नगरातील बद्रीनाथ सोसायटीजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात झाला. किशा गुरनुले (वय 5 वर्षे) ही जेवण झाल्यानंतर शेजाऱ्यासोबत घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावरून जात होती. त्याचवेळी गौरव मालवीय याने भरधाव वेगाने चालविलेल्या काळ्या रंगाच्या कारने किशाला जोरदार धडक दिली.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित

धडकेत किशा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किशाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी कारचालक गौरव मालवीय याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून, दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केली आहे.

कामठी मार्गावर तरुणीचा बसखाली येऊन मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी नागपूरच्या कामठी मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. सायोना पब्लिक स्कूलसमोर अंजली पांडे ही तरुणी ई-बाईकवरून जात असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर एकाच बाजूने दोन्ही दिशांची वाहतूक सुरू होती. याच मार्गावरील खड्ड्यामुळे ई-बाईकचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

इलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली

अंजली रस्त्यावर कोसळल्यानंतर मागून येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्याइलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली आली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मनपाच्या इलेक्ट्रिक बसचालकाला ताब्यात घेतले असून, अपघात नेमका रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास सुरू आहे. एका बाजूला घराबाहेर पडलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा भरधाव कारच्या धडकेत जीव गेला, तर दुसरीकडे रस्त्याच्या परिस्थितीमुळे तरुणीला जीव गमवावा लागल्याची शक्यता आहे. सलग घडलेल्या या दोन अपघातांनी नागपुरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *