दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड परिसरात गुरुवारी पहाटे एक विचित्र घटना घडली. एक तरुण वाहतूक पोलिसांची नवी कोरी कार घेऊन पसार झाला. हे समजताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना चुकविण्यासाठी हा तरुण वाटेत येणाऱ्या वाहनांना धडक देत गाडी दामटत होता. अखेर मलबार हिल परिसरात पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणी गावदेवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
नेमकं काय झालं?
कोस्टल रोड परिसरात ताडदेव येथे एक चालक विरुद्ध दिशेने कार चालवत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. या चालकाला पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या चालकाला पोलिसांनी उलटसुलट प्रश्न केले. दत्ता नाव सांगणाऱ्या या तरुणाने तो चालवत असलेली कार त्याची नसल्याचे सांगितले. पोलिस चौकीत नेऊन अधिक चौकशी केली जात असताना या तरुणाने तेथून पळ काढला. पोलिस त्याच्या मागावर होते.
लिसांची गाडी घेऊन पळाला
कोस्टल रोडच्या ठिकाणी वाहतूक पोलिस गुरुवारी कर्तव्य बजावत होते. पोलिसांच्या गाडीचा चालक जवळच असलेल्या शौचालयात गेला होता. याचवेळी दत्ता पुन्हा कोस्टल रोडवर गेला. पोलिसांच्या गाडीमध्ये कुणी नसल्याचे पाहून आणि चावी गाडीलाच दिसल्याने दत्ता आत शिरला. चालक कॉन्स्टेबल परत येण्याआधीच तो गाडी घेऊन पळाला.
अनेक वाहनांना धडक
चालकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. पोलिसांच्या गाडीचा क्रमांक व माहिती वायरलेसच्या माध्यमातून आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांना देण्यात आली. पोलिसांनी दत्ता याचा पाठलाग करून त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, पोलिसांचे काहीही न ऐकता तो अधिक वेगात गाडी चालवत होता. या दरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली, गाडी दुभाजकाला घासली, पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स आणि पोलिसांच्या अन्य गाडीलाही त्याने धडक दिली. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवत अखेर मलबार हिल परिसरात दत्ताला गाठले.
दत्तात्रय झांझुर्टे असे ४५ वर्षीय आरोपी तरुणाचे नाव आहे. तो ओशिवरा भागातील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार, दत्ता आपल्या मित्राची कार चालवत असताना कोस्टल रोडच्या बोगद्यात शिरला आणि वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवली; यामुळे या अतिवेगवान मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी धोका निर्माण झाला.
पोलिसांचा तपास सुरु
तपास अधिकारी वरळी, महालक्ष्मी आणि मलबार हिल येथील तसेच कोस्टल रोड बोगद्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनाक्रमाची पुनर्रचना करत आहेत. तसेच, झांझुर्टे याला त्याच्या मित्राची कार कशी मिळाली आणि त्याने बोगद्यामध्ये वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यास का सुरुवात केली, याचीही ते तपासणी करत आहेत.
