धावत्या मुंबई लोकलमधून ढकललं, दिव्यांग वृद्धाचा मृत्यू; कावळा हुसकवताना चुकून धक्का, आरोपी सहप्रवाशाचा बनाव

उपनगरी रेल्वे प्रवासात सहप्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकलल्याने एका ६४ वर्षीय दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. कॅजेटन पिरिस असे या मृत प्रवाशाचे नाव आहे. कावळ्याला हुसकावताना पिरिस यांना चुकून धक्का लागला आणि ते लोकलमधून खाली पडले, असा बनाव आरोपीने करण्याचा प्रयत्न केला.

धावत्या लोकलमधून ढकललं

मुंबई लोकलमध्ये वांद्रे-माहीमदरम्यान गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादानंतर पिरिस यांना धावत्या लोकलमधून ढकलण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद शेख या प्रवाशाला अटक केली.

सहप्रवाशाशी वाद

सांताक्रूझ पूर्वेत राहणाऱ्या कॅजेटन पिरीस यांनी गुरुवारी चर्चगेट-बोरिवली लोकल पकडली. ते दिव्यांगांसाठीच्या डब्यातून प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान सहप्रवासी अमजद शेख याच्याशी त्यांचा वाद झाला. वाद वाढत गेल्याने शेखने पिरिस यांना धावत्या लोकलमधून धक्का दिला. यामुळे ते डब्याबाहेर फेकले गेले.

रुळांवर पडले, मृत घोषित

या घटनेची माहिती रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पिरिस हे रुळांवर पडलेले आढळले. पोलिसांनी त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद शेखला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी चर्चगेटजवळील दर्ग्याच्या परिसरातील फुटपाथवर राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

अविवाहित असलेले कॅजेटन पिरीस हे सांताक्रूझ येथे राहत होते. जवळपास दोन दशकांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला होता.

आरोपीकडून बचावाचा प्रयत्न

‘मी त्यावेळी अस्वस्थ होतो व कावळ्याला हुसकावताना पिरिस यांना चुकून धक्का लागला आणि ते लोकलमधून खाली पडले’, असा दावा आरोपीने केला आहे. आरोपीचा दावा, साक्षीदारांची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनेचा नेमका क्रम तपासण्यात येत आहे. वादाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी रेल्वे पोलिसाकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *