महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण, हवामान विभागाचा ताजा अंदाज

पावसाळ्याच्या उत्तरार्धापासून एल निनोची तीव्रता अधिक जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचे पूर्वानुमान जारी केले असून यानुसार राज्यात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिकांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो, याकडे हवामान अभ्यासक लक्ष वेधत आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच पावसाची तूट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट आणि २७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच पावसाची तूट आहे. या दोन आठवड्यांच्या अंदाजाबद्दल अधिक खात्री व्यक्त करताना त्यानंतरच्या दोन आठवड्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या पक्व अवस्थेत असलेल्या खरीप पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

पिकांच्या अंतिम वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम

पावसाचा खंड वाढल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांच्या अंतिम वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारख्या पिकांसाठी पुढील काही आठवडे महत्त्वाचे ठरू शकतील. आधी झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा असलेल्या भागात त्याचा परिणाम तुलनेने कमी असू शकतो. मात्र, पावसाचा खंड दीर्घकाळ वाढल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

पावसामध्ये खंड पडल्यास तापमानाचा पारा चढा

पावसाबरोबरच तापमानाची स्थितीही महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असू शकेल. मात्र त्यानंतर पावसामध्ये खंड पडल्यास तापमानाचा पारा चढा राहू शकतो. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे कमाल तापमानाचा पारा चढू शकतो. त्यानंतरच्या आठवड्यात १७ सप्टेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक नोंदले जाईल अशी शक्यता आहे.

कमी पाऊस आणि अधिक तापमान अशी परिस्थिती निर्माण झाल्यास बाष्पीभवन वाढून जमिनीतील आर्द्रता वेगाने कमी होऊ शकते. त्यामुळे पिकांवरील पाण्याचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *