पुण्यात दोस्तीत कुस्ती! व्हॉट्सॲपवर स्टेटसमुळे डोक्यात सणक, वेताळ टेकडीवर बोलावून जवळच्याच मित्रांनी काटा काढला; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

​पुण्यातील वेताळ टेकडी परिसरात एका 17 वर्षांच्या मुलाची त्याच्याच जवळच्या मित्रांनी डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील ‘विरोधी गटाचे स्टेटस’ ठेवल्याच्या क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

काही महिन्यांपासून त्यांच्यात घनिष्ठ मैत्री

​मयत तरुण आणि ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे विधीसंघर्षित बालक असून त्यांचे वय 17 वर्षे आहे. हे तिघेही कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटी परिसरातील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. मयत मुलगा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर आरोपींपैकी एक जण बारावीत शिकत असून दुसरा कोणताही व्यवसाय किंवा काम करत नव्हता.

विरोधी गटाच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲपवर स्टेटस

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन आरोपीचा स्थानिक पातळीवरील दुसऱ्या एका गटाशी वाद झाला होता. या वादावरून या मित्रांमध्ये वारंवार चर्चाही झाली होती. मात्र, मयत तरुण सतत आरोपींच्या विरोधी गटाच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत होता. ‘तू आपल्या विरोधकांचे स्टेटस ठेवू नकोस,’ अशी ताकीद आरोपींनी त्याला अनेकदा दिली होती. मात्र, मयत मुलानं त्याकडे दुर्लक्ष करत स्टेटस ठेवणं सुरूच ठेवल्यामुळे आरोपींच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण झाला होता.

वर्मी घाव बसल्यामुळे जागीच मृत्यू

​याच वादातून आरोपींनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. मयत मित्राला संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्याला राजगडावर फिरायला जाण्याची गळ घातली. मंगळवारी हे तिघेही राजगडावर गेले आणि दिवसभर फिरून रात्री उशिरा पुण्यात परतले. शहरात आल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला बहाणा करून वेताळ टेकडीवरील मोकळ्या भागात नेलं. मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून आरोपींनी सोबत आणलेल्या हातोड्यानं त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले. वर्मी घाव बसल्यामुळे तो जागीच कोसळला आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

कोथरूड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा

​बुधवारी सकाळी व्यायामासाठी टेकडीवर गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून कोथरूड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं. मयत मुलाच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *