ही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ने (पीओपी) बनवलेल्या मूर्तींच्या नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनाच्या प्रश्नावर गणेशभक्त, मूर्तीकार व गणेशोत्सव मंडळांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. ‘अंतिम निकाल येईपर्यंत सहा फुटांवरील पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलप्रवाहांत विसर्जन करता येईल, हा २४ जुलै २०२५ रोजीचा आदेश लागू राहील’, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने सुधारित आदेशाद्वारे दिले.
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच
गेल्या वर्षी ९ जून रोजीच्या आदेशाने न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (सीपीसीबी) बदललेली भूमिका विचारात घेऊन, पीओपी मूर्तींची निर्मिती व विक्रीला परवानगी दिली होती. परंतु, अशा मूर्तींचे विसर्जन न्यायालयाच्या परवानगीविना करता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्य सरकारचे विसर्जन धोरण लक्षात घेऊन केवळ ३१ मार्च २०२६पर्यंतच्या कालावधीसाठी दिलासा देताना, सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच आणि त्याहून अधिक उंचीच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन समुद्रासह नैसर्गिक जलप्रवाहांत करण्यास न्यायालयाने २४ जुलै २०२५च्या आदेशाने परवानगी दिली होती.
