राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी केली. सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते; तसेच तीन लाखांपासून दहा लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.
१२ प्रमुख त्रुटी
‘२०११ मध्ये ‘एफएसएसएआय’चा कायदा लागू झाला. त्यानुसार परवाना घेणे आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. तपासणीदरम्यान १२ प्रमुख त्रुटी आढळल्या. अनेक खाद्यतेल उत्पादकांकडे परवाना किंवा नोंदणी नाही. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळली असून, ॲसिडिक घटक आणि औद्योगिक ट्रान्सफॅटही आढळले आहेत. तेलाचा खरा स्रोत; तसेच उत्पादन दिनांक लपविण्यात येतो. मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकले जात असल्याचेही समोर आले आहे,’ असे तुकाराम मुंढे म्हणाले.
खाद्यतेलाबाबत विशेष आदेश
मुंढे यांच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी ॲगमार्कशिवाय तेलविक्री केली जाते. सुट्या स्वरूपात खाद्यतेल विकले जाते. फूड ग्रेड मटेरियल नसलेल्या वेष्टनाचा वापर केला जातो. घातक खनिज तेलाची वाहतूक झालेल्या टँकरमधूनच खाद्यतेलाची वाहतूक करण्यात येते; तसेच गंजलेल्या कॅनमध्ये तेलाचे पुन्हा पॅकिंग केले जाते. सन २०२५-२६ मध्ये एक हजार २४७ खाद्यतेल नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एक हजार १४२ नमुने प्रमाणित आढळले, ७७ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले; तसेच १३ नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खाद्यतेलाबाबत विशेष आदेश काढण्यात आल्याचे मुंढे म्हणाले.
नागरिकांना आवाहन
आता उत्पादकांसाठी नोंदणी आणि परवाना बंधनकारक असेल. खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद स्वरूपातच करता येईल. सुटे तेल विकता येणार नाही. नागरिकांनीही सुटे खाद्यतेल खरेदी करू नये, असे आवाहन मुंढे यांनी केले.
गरिबांना फटका शक्य
या निर्णयाचा गोरगरीब नागरिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निम्न मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या नागरिकांना खाद्यतेल लिटरच्या हिशेबाने विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे ते रोजच्या वाणसामानासोबत आवश्यक तेवढेच तेल खरेदी करतात. या घटकांचा पुरेसा विचार न करता घाईघाईने हा निर्णय घेण्यात आल्याची टीका काही सामाजिक संघटनांकडून होत आहे.
वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यांत खाद्यतेलाचे पॅकेजिंग केले जात असल्याचे प्रकार आढळले आहेत. त्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे. तळणीच्या तेलाचा वारंवार वापर केल्यास ते वारंवार तापते आणि त्यातून हानिकारक ट्रान्सफॅट तयार होतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तळणीच्या तेलाचीही शुद्धता आणि दर्जा राखणे बंधनकारक करण्यात आल्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
