ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी मनिष जोशी

संदीप माळवी यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या ठाणे महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त (१) पदावर उपायुक्त मनिष जोशी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने गुरूवारी याबाबतचा शासन आदेश काढला आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी हे जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी महापालिकेने उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत उपलब्ध कागदपत्रांची छाननी केल्यानंतर मनिष जोशी यांच्या नावाची अतिरिक्त आयुक्तपदासाठी शिफारस करण्यात आली.

शासनाने या शिफारशीला मंजुरी देत जोशी यांची १ ऑगस्ट २०२६ पासून अतिरिक्त आयुक्त (१) म्हणून नियुक्ती केली आहे. आयुक्तांनी जोशी यांना अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. मनिष जोशी हे सुद्धा ऑगस्ट महिनाअखेर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या काही दिवस आधी त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *