पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक भोंदूगिरीचा प्रकार समोर आला आहे. एका २३ वर्षीय कथित आध्यात्मिक गुरूने एका तरुणीला भीती दाखवून तिच्याकडे अर्धनग्न फोटोंची मागणी केल्याची घटना घडली आहे. शरीरातील नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) काढून टाकण्याचे आमिष दाखवून त्याने हा प्रकार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिव्य जितेंद्र परमार (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या कथित आध्यात्मिक गुरूचे नाव आहे. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिव्य परमार हा महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्वतःला ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ आणि सोशल मीडिया ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच त्याने ठिकठिकाणी भाषणे देण्यास प्रारंभ केला होता.(Pune Crime News)
कालांतराने त्याने सोशल मीडियावर स्वतःच्या नावाचे एक चॅनेल सुरू करून मोठा चाहता वर्ग (Followers) तयार केला. पुढे तो या चाहत्यांकडून शुल्क आकारून व्याख्याने देऊ लागला. काही दिवसांनी त्याने स्वतःला ‘आध्यात्मिक गुरू’ म्हणून भासवण्यास सुरुवात केली. त्याच्या संपर्कात येणाऱ्या महिला आणि तरुणींना तो व्यायामासंबंधीच्या टिप्स देत असे. “तुमची व्यायामातील प्रगती पाहायची असेल तर अर्धनग्न फोटो पाठवा,” अशी मागणी तो करायचा आणि नकार दिल्यास काहींना भीतीही दाखवायचा.
फिजिकल अॅक्टिव्हिटीच्या नावाखाली फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादी तरुणीशी संपर्क साधला. स्वतःला आध्यात्मिक गुरू सांगत त्याने तरुणीशी संवाद वाढवला. “फिजिकल अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ताकद/ऊर्जा काढून टाकता येते,” असे आमिष त्याने तरुणीला दाखवले. त्यानंतर तिला भीती दाखवून मोबाईलवरून तिचे अर्धनग्न फोटो मागवून घेतले.
पोलीस कारवाई आणि न्यायालयीन कोठडी
घाबरलेल्या तरुणीने थेट कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दिव्य परमारला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला असून, त्यातील फोटो, मेसेज, व्हिडिओ तसेच इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती महिला किंवा तरुणींना जाळ्यात ओढले आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५, ७८, ७९ व ३१८(४) (विनयभंग व फसवणूक), जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील कलम ३(२) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
