घराचे स्वप्न राहिले अपूर्णच! गोरेगावात 27 जणांना गंडवलं, तब्बल 56 लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा

मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी काहीही करण्याची सर्वसामान्यांची तयारी असते. याचा गैरफायदा घेत, म्हाडाचे घर योजनेत मिळवून देतो सांगून गोरेगावमध्ये अनेकांना फसविण्यात आले आहे. यात, २७ जणांची सुमारे ५६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबणविक्रेते राकेश गुप्ता यांच्या तक्रारीवरून अनिता तलावडे, दिव्येश प्रसाद आणि अंकिता प्रसाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या राकेश यांच्या शेजारी अनिता तलावडे राहतात. गुप्ता घराच्या शोधात असल्याची माहिती असल्याने त्यांनी म्हाडाच्या योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याचे सांगितले. दिव्येश आणि अंकिता यांची म्हाडात ओळख असून ते विविध योजनांमध्ये स्वस्तात घरे मिळवून देतात, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर तलावडे यांनी गुप्ता यांची प्रसाद दाम्पत्याशी ओळख करून दिली.

गोरेगावच्या प्रेमनगरमध्ये एक बीएचके घर १८ लाख रुपयांत मिळवून देण्याचे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपींनी सांगितले. राकेश यांनी तीन लाख रुपये देऊन दोन घरांची मागणी केली. त्यानंतर मोठे घर उपलब्ध असल्याचे सांगत प्रसाद दाम्पत्याने आणखी साडेतीन लाख रुपये घेतले. मात्र, पैसे देऊन बराच कालावधी उलटूनही घर मिळाले नाही. विचारणा केल्यावर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

संशय आल्याने राकेश यांनी चौकशी केली असता, त्यांच्याप्रमाणेच अन्य अनेकांकडून या तिघांनी पैसे घेतल्याचे समोर आले. राकेश यांनी माहिती गोळा केल्यानंतर २७ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *