मुंबई महापालिकेच्या सभागृहात बेस्ट आगाराच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये मध्यरात्री जोरदार वाद झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नगरसेवक राजा रहेबर खान यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी सभागृहात ‘दादागिरी चालणार नाही’, असा इशारा दिला. या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमावरून महापौरांवर जोरदार टीका केली.
‘काम जमत नसेल तर पद सोडा. पण मुंबईकरांच्या प्रतिनिधींवर असा आरडाओरडा करून नैराश्य व्यक्त करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हा महापौर पदाचा आणि मुंबईकरांचाही अपमान आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
महापालिकेच्या विशेष सभेत मंगळवारी बेस्ट बस आगाराच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. काँग्रेसचे नगरसेवक राजा रहेबर खान यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महापौरांविरोधात कथित आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. खान यांनी महापौरांच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात गोंधळ उडाला.
या वेळी भाजपचे महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर आपली भूमिका मांडत होते. अचानक झालेल्या गोंधळामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक समोरासमोर आले. काही नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले.
महापौरांचा ‘दादागिरी चालणार नाही’
गोंधळानंतर महापौर रितू तावडे यांनी सभागृहातील शिस्त आणि प्रतिष्ठा कायम राखण्याचा इशारा दिला. ‘सभागृहात गोंधळ किंवा दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. गरज पडल्यास संबंधित नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बेस्ट आगाराच्या प्रस्तावावरून वाद बेस्ट आगारांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस, विरोधी पक्ष व इतर पक्षांच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडल्यानंतर सभागृहनेते आपले म्हणणे मांडत होते. मात्र, इतर सदस्यांना बोलण्याची संधी न मिळाल्याने खान यांनी आक्षेप घेतला. त्यातून वाद वाढत जाऊन सभागृहात शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान, विशेष सभेत बेस्ट आगाराच्या पुनर्विकासासोबतच फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलणे आणि विनाभोगवटा इमारतींसाठी अभय योजना यांसारखे महत्त्वाचे प्रस्तावही चर्चेसाठी होते. दुपारी तीन वाजता सुरू झालेले सभेचे कामकाज रात्री साडेबारापर्यंत सुरू होते.
