ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीमध्ये बाधित होणाऱ्या बांदल चाळीतील ५० कुटुंबांचे आधी पुनर्वसन करून नंतरच चाळीचे निष्कासन करण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना यांनी दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होण्याची चिन्हे आहेत.
नवीन ठाणे रेल्वे स्थानकालगत गेल्या ६० वर्षांपासून बांदल चाळ असून त्यात ५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. रेल्वे प्रशासनाने या कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
आमदार केळकर याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. रहिवाशांसह त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना आणि अन्य अधिकाऱ्यांची गुरुवारी भेट घेऊन रहिवाशांची बाजू मांडली. आधी कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करा, त्यानंतरच चाळीचे निष्कासन करा, अशी मागणी केळकर यांनी केली. मीना यांनी ही मागणी मान्य केली असून रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
