मुंबई- इमारतीत गोण्यांच्या खाली लपवला होता मृतदेह! तपासात भलताच ट्विस्ट, पुतण्याने काकीसोबत प्रेम…; पोलिसांनाच गंडवत होता आरोपी

मुंबईतील खार पोलीस ठाणे हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवून ठेवण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला होता. पोलिसांनी तपाप सुरु केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, आरोपी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

मृतदेह सापडल्यानंतर खार पोलीस ठाणे येथे कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाली होती. तसंच 19 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला.

18 ऑगस्टला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला फोन आला. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकामाच्या ठिकाणी एक इसम सिमेंटच्या गोण्यांखाली बेशुद्ध अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं. माहिती मिळताच खार पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न जालं. त्याची ओळख रविशंकर नंदकिशोर गिरी (35) अशी पटली. तो बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी असून, बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.

प्राथमिक तपासात त्याचा अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवून ठेवल्याचे निदर्शनास आलं. यानंतर खार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

तपासातून आरोपीचा पर्दाफाश

तपासादरम्यान घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तेथील तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच बांधकाम साईटवरील मजुरांकडून मिळालेली माहिती याचा आधार घेण्यात आला. तपासादरम्यान मयताचा पुतण्या (17 वर्ष), हा स्वतः तक्रारदाराच्या भूमिकेत राहून पोलिसांची दिशाभूल करण्याचा व घटनेबाबत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले.

तपास पथकाने त्याच्या बोलण्याची लकब, देहबोली, घटनाक्रमाबाबत दिलेली माहिती, हालचाली तसेच जबाबातील विसंगती यांचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतर त्याच्याकडे शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीने चौकशी करण्यात आली. घटनास्थळावरील तांत्रिक पुराव्यांची बारकाईने पडताळणी, इतर मजुरांकडून केलेली सखोल चौकशी आणि आरोपीच्या जबाबातील विसंगती यांची सांगड घातल्यानंतर तपास पथकाचा संशय अधिक दृढ झाला. पुढील तपासात मयताचा पुतण्या विशालकुमार रामलखन गिरी हाच सदर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

हत्येचे कारण

तपासादरम्यान सदर हत्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीचे काकीशी अनैतिक संबंध होते. यामुळे त्याने काकाची हत्या केली. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *