सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतात किंवा गावखेड्यातील महावितरणच्या विद्युत यंत्रणांपासून अधिक सुरक्षितता बाळगणे गरजेचे असते. त्यात, शेतात मोटर चालू करताना असो किंवा शेतातून हायव्होल्टेज विजेची (Electricity) वायर गेली असल्यासं तिथेही काळजी घेणे असो, महावितरणच्या आवाहनापेक्षा नागरिकांनीही स्वत: सावध राहायला हवं. कारण, विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. दौंड (Daund) तालुक्यातील सोनवणेमळा गावात या दुर्दैवी घटनेनंतर शोककळा पसरली आहे.
दौंड तालुक्यातील राहू गावातील सोनवणेमळा येथे विजेच्या धक्क्याने चुलत भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का बसून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. ओम भोईटे आणि रोहित भोईटे अशी मृतांची नावे आहेत, आज सकाळी ही घटना घडली. अनिल भोईटे यांच्या घरी सकाळच्या सुमारास घरगुती वीजेचं काम सुरू होते. त्यावेळी ओम यास अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. ओमला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्याचा चुलत भाऊ रोहित मदतीसाठी धावला. मात्र, ओमला वाचविण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला.
दरम्यान, दोघांनाही विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आईनेही मुलांच्या बचावासाठी धाव घेतली होती. मात्र, सुदैवाने त्या बचावल्या आहेत. त्यानंतर कुटुंबीयांनी दोन्ही तरुणांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ओम आणि रोहित यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेनं गावावर शोककळा पसरली असून भोईटे कुटुंबीयांवरील दु:खाचा डोंगर अनेकांच्या डोळे पाणावणार आहे.
