घरातील तरुण मुलगा कायमचा दूर गेल्याच्या दु:खातही कलावते कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. भीषण अपघातात मेंदुमृत झालेल्या धीरज कलावते यांच्या अवयवदानास कुटुंबीयांनी संमती देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
कारचा भीषण अपघात
धीरज कलावते हे फ्लोअर मिलमध्ये काम करीत होते. १२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता चांदूर रेल्वे मार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यांना प्रथम चांदूर रेल्वे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने रात्री १२.३० वाजताच्या सुमारास त्यांना अमरावती येथील रीम्स रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांना रॅडियन्ट सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांकडून मेंदुमृत घोषित
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. आनंद काकानी आणि त्यांच्या पथकाने धीरज यांना मेंदुमृत घोषित केले.
दुःखद प्रसंगी कुटुंबाचं अवयवदान
यानंतर रुग्णालयाच्या समन्वयक डॉ. हर्षाली लखतरिया यांनी कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगितली. या असह्य दु:खाच्या प्रसंगीही वडील संतोष कलावते, आई अनिता कलावते आणि बहीण भाग्यश्री कलावते यांनी अवयवदानास संमती दिली.
अनेकांना नवं जीवन
अवयवदानाची माहिती मिळाल्यानंतर झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि सचिव डॉ. शैलेश गहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपण समन्वयक दिनेश मंडपे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. धीरज यांचे यकृत नागपूर येथील न्यू एरा रुग्णालयातील ६१ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. एक मूत्रपिंड अमरावती येथील रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या ३५ वर्षीय महिला रुग्णाला, तर दुसरे मूत्रपिंड नागपूर येथील किम्स किंग्जवे हॉस्पिटलमधील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. दोन्ही डोळ्यांची बुबुळे अमरावती जिल्हा रुग्णालयाला देण्यात आली.
अवयव वेळेत संबंधित प्रत्यारोपण केंद्रांपर्यंत पोहोचावेत, यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.
