सव्वा तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत, नॅशनल पार्कच्या खालून जाणार रस्ता, असा असेल संपूर्ण प्रकल्प

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील बोगदा खोदकामासाठी तुळशी नावाची भव्य टनेल बोअरिंग मशीन सज्ज झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 5.30 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याच्या खोदकामास सोमवारी सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांतील प्रवासाचा वेळ अवघ्या 20 मिनिटांपर्यंत येणार असून प्रवाशांची तब्बल 70 मिनिटे वाचणार आहेत. या प्रकल्पामुळं मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट जोडणार आहे.

कसा असेल हा प्रकल्प?

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाची एकूण लांबी 12.20 किलोमीटर असून तो चार टप्प्यांत राबविणार आहे. तिसऱ्या टप्प्यात गोरेगाव पूर्वेतील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिमेतील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल बोअरिंग मशिनद्वारे प्रत्येकी तीन मार्गिकांचे 5.30 किलोमीटर लांबीचे दुहेरी बोगदे तयार होणार आहेत.

राष्ट्रीय उद्यानाखालील कामामुळे पर्यावरण व जैवविविधतेवर परिणाम होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची आवश्यक मंजुरी व सर्वोच्च न्यायालयाची वृक्षतोड परवानगी प्रकल्पाला मिळाली असून येथील सुमारे 206 बाधित प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे 23 मजली सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे.

गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमरनगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल बोरिंग मशिनद्वारे प्रत्येकी तीन मार्गिकांचे दुहेरी बोगदे.  बोगद्यांमध्ये यांत्रिक वायुवीजन, मिस्ट आधारित अग्निशमन प्रणाली, सीसीटीव्ही, पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन प्रणाली, एलईडी प्रकाशयोजना व आधुनिक दिशादर्शक फलक यांसारख्या सुविधा असतील. तसेच, प्रत्येक बोगद्यात जलवाहिनी टाकण्यासाठी युटिलिटी डक्टची तरतूद करण्यात आली आहे.

पहिला टप्पा कुठून कुठपर्यंत? 

प्रस्तावित उड्डाणपूल दिंडोशी कोर्टाजवळून सुरू होऊन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ उतरणार आहे. येथून वाहनचालकांना थेट ट्विन टनलमध्ये प्रवेश करता येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणारा चौथा प्रमुख मार्ग उपलब्ध होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन प्रवासी मार्ग तयार होईल.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड किनारी रस्ता, मालाड माईंडस्पेस, गोरेगाव, विकेंडी लिंक रोड आणि ऐरोली यांना जोडेल. त्यामुळं उत्तर मुंबईतील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *