मतदारांसाठीच्या SIR प्रक्रियेची मुदत संपली; २४ तारखेच्या यादीत नाव दिसलं नाही तर घाबरू नका, काय-काय करायचं ते समजून घ्या!

राज्यातील मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रिया अखेर सोमवारी पूर्ण झाली. मतदारांकडून घेण्यात आलेल्या गणना अर्जांच्या डिजिटायझेशनची मुदतही सोमवारी संपली. या प्रक्रियेची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आज जाहीर होणार आहे.

सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ अर्ज अद्याप संकलित झाले नसल्याचे कळते. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात ६०.९२ टक्के, मुंबई शहरात ६२.३८ टक्के, मुंबई उपनगरात ६५.५० टक्के आणि पुण्यात ६७.९५ टक्के गणना अर्जांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्याउलट बुलढाणा, हिंगोली, उस्मानाबाद, गोंदिया, बीड, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत डिजिटायझेशनची टक्केवारी ८४ टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली.

२४ ऑगस्टला प्रारूप यादी, नाव नसल्यास काय कराल?

२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या प्रारूप यादीत प्रत्यक्षात किती मतदारांची नावे कायम राहतात, किती नावे वगळली जातात याकडे राजकीय पक्षांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान मतदारांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर छाननी तसेच दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

पुणे जिल्ह्यात कशी आहे स्थिती?

मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची (एसआयआर) सोमवारी मुदत संपली असून, पुणे जिल्ह्यातील १०० टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मात्र, एकूण मतदारांपैकी सुमारे २८ लाख ७९ हजार ७२८ मतदार आता मतदारयादीतून वगळले जाण्याची चिन्हे आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण ३१.७१ टक्के असून, एवढे मतदार मतदारयादीतून वगळण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघांतील सर्वाधिक मतदार मृत, स्थलांतरित किंवा ‘नॉट रेडी टू साइन’ या वर्गवारीत असल्याने त्यांनी अर्ज जमा केले नसल्याचे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *