नेव्ही नगर सामूहिक मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती, पत्नी- मुलांचा मृत्यू होईपर्यंत थांबला अन् मग…; मोबाईल ठरणार महत्त्वाचा पुरावा?

मुंबईतील नेव्ही नगर येथील नैदलाच्या कर्मचाऱ्याने पत्नी व मुलांची हत्या करत नंतर आत्महत्या केल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी घडली होती. पुरणमल मेहरा असं नौदलाच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर ओमा असं त्याच्या पत्नीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुरणमल मेहरा आणि ओमा यांच्यात वाद होते. तिने या वादाची कल्पना तिच्या वडिलांनाही दिली होती. पतीसोबत राहणे असह्य झाल्याने ओमाने तिच्या वडिलांना घरी बोलवून घेतले होते. तसंच, मुलांना आणि तिला घरी घेऊन जा, अशी विनंतीही तिने केली होती. मुलीची तक्रार ऐकून तिचे घर गाठले होते. मात्र पुरणमलने मुलांना सोबत घेऊन जायचे नाही, असं म्हणत वाद घेतला. त्यानंतर ओमाचे वडिल आल्यापावली परत गेले. त्यानंतर काहीच दिवसांत पुरणमलने ओमा आणि मुलांची हत्या करत आत्महत्या केली. जर ओमाला वेळीच घरी नेले असते तप ती वाचली असती, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरणमलने पत्नी आणि दोन्ही मुलांना विष दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे का? याची खात्री केली. त्यानंतर काही तासांनंतर त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. कारण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिन्ही मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूची नेमकी वेळ स्पष्ट होणार आहे.

मोबाईल ठरणार महत्त्वाचा पुरावा?

पुरणमलने पत्नी आणि मुलांच्या हत्येनंतर मोचाईलमधील तपशील डिलीट केला आहे. त्यात नेमके काय होते? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या मोबाईलमधील तपशील पुन्हा मिळविण्यासाठीही पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसंच, नेव्हीनगरमधील या हत्याकांडामागे कौटुंबिक वाद नेमका कोणत्या कारणातून विकोपाला गेला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याशिवाय मालमत्तेचा वाद, नोकरीशी संबंधित प्रश्न तसेच आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार यांचाही तपासाच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

डिसेंबर 2020 मध्ये पुरणमल आणि ओमाचा विवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून पुरणमल मानसिक तणावात होता, त्यावर उपचार देखील सुरू होते. त्याला आकडीचाही त्रास होता. दोघांमधील वाद वाढत गेले. मुलीची अवस्था पाहून तिचे वडील 9ऑगस्ट रोजी तिला घेण्यासाठी घरी पोहोचले. त्यांनी पुरणमलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तयार नव्हता.

असा होता घटनाक्रम

14 ऑगस्ट : रात्री 11 वाजता वडिलांना संदेश

15 ऑगस्ट : सकाळी 6 वाजता आईने संदेश वाचून कुटुंबियांना कळवताच मेहरा कुटुंबियांना फोन सुरू

सायंकाळी 7 वाजता नौदल नियंत्रण कक्षात कॉल करून माहिती

रात्री 11 वाजता : कफ परेड पोलिसांना आत्महत्येबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल

रात्री 11 वाजता :कुटुंबियांना मेहरा कुटुंबियांच्या मृत्यूची माहिती

16 ऑगस्ट : रात्री शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *