महाळुंगेतत एका रस्ते अपघातात अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास महालुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ एक भीषण अपघात झाला. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय झालं?
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडील आपल्या मुलगा आणि मुलीला ट्यूशनला सोडायला जात होते. तिघेही महालुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळून जात असताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे दुचाकी अचानक घसरली. त्यामुळे तिघेही जमिनीवर कोसळले. यावेळी मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली दुचाकीवरून पडलेला मुलगा आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित वडील आणि मुलीला सुद्धा काहीही दुखापत झाली. या भीषण अपघातात परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी :
महाळुंगे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, वाहतूक नियंत्रण वाढवावे आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अपघाताबाबतची पुढील अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
