मुंबई तापाने फणफणली! तीन महिन्यांत मलेरियाच्या 3 हजार रुग्णांची नोंद; डेंग्यूचे 1079, तर H1N1चे 309 रुग्ण

पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पावसाळी आजारांचा धोका मुंबईत कायम आहे. मलेरिया आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत यंदा लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत मलेरियाचे ३,१७७ रुग्ण आढळले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या २,८५२ होती. एच१एन१चे रुग्णही ७२ वरून ३०९ पर्यंत वाढले आहेत.

दुसरीकडे, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि कोविडच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण १,२१७ वरून १,०७९ झाले, तर चिकनगुनियाची संख्या २७९ वरून केवळ ३३ इतकी खाली आली आहे.

कामगारांना प्रशिक्षण

मुंबईतील ४,०७५ बांधकामस्थळांवर ‘आरोग्यसाथी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी पाच ते दहा कर्मचाऱ्यांचा सहभाग घेऊन एकूण २० ते ३० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत १२६ बांधकामस्थळांवरील १,६२२ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

२६ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

मुंबई महापालिकेने १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ५,६३,३८२ घरांचे सर्वेक्षण केले. या मोहिमेत २६,८५,८२८ मुंबईकरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२,१५८ रक्तनमुने संकलित करण्यात आले. लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार घेतलेल्या मुंबईकरांची संख्या १०,५४२ नोंदवण्यात आली आहे.

‘आजाराची लक्षणे दिसल्यास संपर्क साधा’

साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, गमबूट वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी काढून टाकणे, घराभोवती डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे, तसेच कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे दिसल्यास पालिकेच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

डासांच्या उत्पत्तीस्थळांची तपासणी
मलेरिया नियंत्रण मोहिमेत १७,७९३ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३,३१९ ठिकाणी अनोफिलीस डासांची पैदास आढळली. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांची उत्पत्तीस्थळे ११,२२७ ठिकाणी सापडली. ई, के-पश्चिम, जी-दक्षिण, एफ-दक्षिण आणि एच-पश्चिम विभागांत मलेरियाचे रुग्ण वाढल्याची नोंद आहे.

रुग्णसंख्येतील बदल

आजार— मागील वर्षी— यंदा— बदल

मलेरिया—– २,८५२— ३,१७७— +३२५

एच१एन१—– ७२— ३०९— +२३७

डेंग्यू—– १,२१७— १,०७९— -१३८

चिकनगुनिया—– २७९— ३३— -२४६

लेप्टोस्पायरोसिस—– ३२२— १८९— -१३३

गॅस्ट्रो—– २,२७४— १,७५२— -५२२

कोविड—– ६६८— १२४— -५४४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *