आधी बाबा गेले, आता आई! लेकीच्या धाडसी निर्णयाला नातेवाईकांची साथ, माऊलीच्या पार्थिवाला मुखाग्नी, भांडुपवासियांचे डोळे पाणावले

निष्ठूर नियतीचा खेळ कधी कोणाला कळला नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी येथील सुवरे कुटुंबाची काही वर्षांतच ताटातूट झाले. चार वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाले, त्यातच आता मातृछत्रही काळाने हिरावून नेले. मात्र तरीही या मोठ्या दुःखद प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जात मुलीने रुढी-परंपरांच्या पलिकडे जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या आईच्या चितेला मुखाग्नी देत केवळ अंत्यसंस्काराचंच कर्तव्य पार पाडले नाही, तर ‘मुलगा-मुलगी समान’ या विचारांचा संदेशही या कृतीतून दिला आहे.

मुलींचा आईच्या पार्थिवाला मुखाग्नी

छाया चंद्रकांत सुवरे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शामली चंद्रकांत सुवरे हिने आपल्या लाडक्या आईला मुखाग्नी दिला. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. मुलींचे वडील एका खाजगी कंपनीत काम करत होते. तर आई एका गारमेंट शॉपमध्ये कामाला होती, घरची परिस्थिती बेताची. अशावेळी दुःखद प्रसंगात या मुलींनी दाखवलेलं धाडस हे कौतुकास्पद ठरलं आहे.

मूळच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी बनाची वाडी हे माहेर असलेल्या आणि कोंडये गाव हे सासर असलेल्या छाया माणिक सापटे ऊर्फ छाया चंद्रकांत सुवरे. त्यांचे मुंबईतील भांडुप येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय, नातेवाईक आणि दोन्ही गावांतील ग्रामस्थांवर शोककळा पसरली.

आई-वडील दोघांचाही हार्ट अटॅकने मृत्यू

अवघ्या चार वर्षांपूर्वी छाया सुवरे यांचे पती चंद्रकांत सुवरे यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. पतीच्या निधनाचा धक्का पचवत त्या कुटुंब सावरत होत्या. दोन लेकींच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत त्यांना शिकवले, मुलींनीही आपल्या आईला साथ देण्याचा निर्धार करत तिला सुखाचे दिवस दाखवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र नियतीने पितृछत्र ओरबाडून नेल्यानंतर पुन्हा एकदा लेकींवर घाला घालत छाया सुवरे यांनाही हिरावून घेतले. आई-वडिलांच्या निधनामुळे दोन्ही मुलींवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आईचे अंत्यसंस्कार करण्याच्या मुलींच्या या निर्णयाला उक्षी आणि कोंडये गावातील ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला. त्यांच्या निर्णयाचा आदर करत ग्रामस्थांनी दोन्ही मुलींना प्रोत्साहन दिले आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुटुंब व गावकरी उभे राहिले. त्यानंतर भांडुप येथील स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात छाया सुवरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची मुलगी शामली सुवरे हिने आपल्या आईच्या चितेला अग्नी देत मुलीचे कर्तव्य पार पाडले.

आईला अखेरचा निरोप देताना मुलींच्या डोळ्यांतही अश्रू होते, सारे वातावरणच भावूक झाले होते. मोठा दुःखद कठीण प्रसंग होता. दुःखाच्या प्रसंगीही मुलींनी घेतलेल्या या धाडसी आणि संवेदनशील निर्णयाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.

बदलत्या विचारधारांचं प्रतीक

शामली सुवरे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून समाजातील बदलत्या विचारसरणीचे प्रतीक ठरला आहे. मुलगी ही केवळ ‘परक्याचे धन’ नसून तीही आई-वडिलांची जबाबदारी, प्रेम आणि कर्तव्य तितक्याच समर्थपणे निभावू शकते, हा संदेश या घटनेतून मिळाला आहे. उक्षी व कोंडये येथील ग्रामस्थांनी या दुःखद प्रसंगी मुलींच्या पाठीशी खंबीर उभे राहत साथ देत अवघ्या जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *