लावणीसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक; अश्लीलता, आक्षेपार्ह कार्यक्रम रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

लावणी आणि इतर लोककलांच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने या कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रम सादर करण्यापूर्वी त्यांच्या संहिता, निवेदन किंवा सारांशाची तपासणी करून मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल.

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला याबाबत निवेदन दिले होते.

लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने केली होती. त्यानुसार मंडळाने योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्र असल्याची खातरजमा केल्यानंतरच कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात, असे मंडळाच्या वतीने पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
‘पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे संगीत, आक्षेपार्ह नृत्यप्रकार आणि अश्लील आशयाचे कार्यक्रम सादर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या निर्णयामुळे अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पारंपरिक लावणी, लोककला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्यास मदत होणार आहे’, असे पाटील यांनी सांगितले.

लावणीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून कला सादर करणे अपेक्षित आहे. प्रमाणित संहिता, निवेदन किंवा सारांशापेक्षा वेगळा अश्लील अथवा आक्षेपार्ह भाग कार्यक्रमात आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल. – सं. पुं. खामकर, सचिव, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *