कचरा टाकण्यावरुन वाद, पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, बायकोचा जागीच मृत्यू; नवऱ्याचीही रुग्णालयात प्राणज्योत मालवली

सांगलीच्या कुपवाडमध्ये 15 ऑगस्ट रोजी झालेल्या खुनी हल्ल्याने आता गंभीर वळण घेतलं आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मोहन केसरेकर यांचा मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वी त्यांची पत्नी मनीषा केसरेकर यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणात आता डबल मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

कुपवाडपरिसरात 15 ऑगस्ट रोजी सकाळी कचरा टाकण्यावरुन किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख याने मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. फरीदने मोहन यांच्या डोक्यात हातोडीने गंभीर वार केले. पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मनीषा यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी मोहन यांच्यावर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या फरीद अब्दुल शेखला पोलिसांनी अवघ्या चार तासात ताब्यात घेतलं. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि एपीआय प्रशांत निशानदार यांच्या पथकानं ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *