प्रियकराला संपवलं, 18 तास वाट पाहिली अन् रात्री तिने मित्रासोबत…; नाशिकमधला हादरवणारा घटनाक्रम

महाराष्ट्राची देवभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणीने मित्राच्या मदतीने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराचा गळा चिरून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रात्रीची योग्य वेळ निवडण्यासाठी तिने तब्बल 18 तास वाट पाहिल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. गुन्हेगारीसंदर्भातील एखाद्या मालिकेतील भाग वाटावा असा घटनाक्रम तपासात उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव वसंत गोरखनाथ सातपुते असं आहे. 40 वर्षीय वसंत पार्थडी फाटा येथील स्वराज्यनगर येथे वास्तव्यास होते. पोलीस तपासामध्ये, प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटनाक्रम समोर आला असून हत्या केल्यानंतर मृतदेहाचं काय करायचं याचं पूर्व नियोजन नसल्याने आरोपींनी तब्बल 18 तास मृतदेह तसाच ठेवला होता. हत्येचा पुरावा असलेला मृतदेह नष्ट करण्यासाठी तब्बल 18 तास आरोपींनी मृतदेह घरात ठेवला होता. त्यानंतर मध्यरात्री कसारा घाटात नेऊन मृतदेह फेकला. गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने कसारा घाटातून मृतदेह शोधला.

कशासाठी केलं हे कृत्य?

मद्यपान आणि जुगाराच्या नाद असल्याच्या रागातून प्रेयसीने मित्राच्या मदतीने वसंतचा काटा काढल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रेयसीने मित्रासह कट रचून खून केल्याचे तपासात समोर आलं आहे. मृतदेह कारमधून कसारा घाटात नेल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. संशयित महिला हसीना शेख साहिल शहा आणि मोईन शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणामध्ये या दोघांबरोबरच त्यांना मदत करणाऱ्या अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

दोन दिवसात दुसरी हत्या, एका दिवसापूर्वी भरचौकात झालेली हत्या

नाशिकमधील ही दोन दिवसात हत्येची दुसरी घटना ठरली आहे. ही घटना घडण्याच्या एक दिवस आधी गोसावीवाडी येथे नाशिकरोडमध्ये सुमीत अरुण पगारे (32) या तरुणाची भरचौकात हत्या करण्यात आली. पानटपरीजवळ उभे असताना बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. पोटात गोळी लागून सुमीतचा मृत्यू झाला. सुमीत मेफेड्रॉन (MD) ड्रग तस्करी प्रकरणात जामीनावर बाहेर होता. जुन्या वैमनस्य, वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामध्ये 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *