पैशाचा पाऊस पाडायचा, लक्ष्मीपूजा करायची आणि त्यासाठी चक्क एका अल्पवयीन मुलीचा वापर करायचा.अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलाय. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली नेमका कोणता विधी केला जाणार होता? अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय.
21 व्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्रात हे चाललंय तरी काय? पैशाचा पाऊस पाडता येतो, या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित विधीची तयारी आणि या विधीसाठी थेट एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उदगीरमध्ये समोर आला आहे.
उदगीर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर करडखेल पाटीजवळ पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या अगोदरही लातूर जिल्ह्यातील अनेक भागात असे प्रकार घडले आहेत त्यामुळे या लोकांना कोणी अघोरी पूजा करण्यासाठी बोलावलं होतं याचा सुद्धा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्याचे अध्यक्ष माधव बावगे यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईही तितकीच धक्कादायक माहीती समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी करण्याच्या तयारीत असलेल्या 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील संशयितांचा समावेश आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन मुलीला या विधीसाठी नेमकं का आणण्यात आलं होतं, याचा तपास आता पोलीस करत आहेत
पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष
लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित विधी आणि त्यासाठी अल्पवयीन मुलीचा कथित वापर. उदगीरमधील या घटनेनं अंधश्रद्धेचं विदारक वास्तव पुन्हा समोर आणलंय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रावर पोहोचलो पण पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधविश्वासातून अजूनही बाहेर पडलो नाही, हेच या घटनेनं दाखवून दिलंय. आता या संपूर्ण प्रकारामागे नेमकं कोण? या विधीचा सूत्रधार कोण? आणि अल्पवयीन मुलीचा वापर का केला जाणार होता? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येणं महत्त्वाचं आहे.
