स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगडावर मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली. मात्र, या गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था नसल्याने पर्यटकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागला. गर्दीचा गैरफायदा घेऊन काही तरुणांनी तरुणींशी असभ्य वर्तन केल्याचे प्रकार घडले. दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्याने सिंहगडावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श
रविवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी हवेली पोलिसांकडे कोणाचीही तक्रार आली नव्हती. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र होते. सुरक्षारक्षक किंवा पोलिसांची पुरेशी उपस्थिती नसल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या.
काही विकृत प्रवृत्तीच्या तरुणांकडून गर्दीचा गैरफायदा घेऊन तरुणींना जाणूनबुजून चुकीचा स्पर्श केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सिंहगडावर यापूर्वीही पर्यटकांमध्ये वाद, हाणामारी आणि अन्य अनुचित प्रकार घडले आहेत. गर्दीच्या काळात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियोजनाची आवश्यकता असताना त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
गर्दीचे व्यवस्थापन गरजेचे
गडावर एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याबरोबरच अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
विशेषतः स्वातंत्र्यदिन, रविवार आणि सुटीच्या दिवशी सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या काळात प्रवेशाचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
कायमस्वरूपी उपाय हवेत
सिंहगड हा पुणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा असून, दर वर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्याबरोबरच पर्यटकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गडावर दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकारही घडले. काही ठिकाणी दगडफेक झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असताना अशा घटनांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
