देशातील वाढती बेरोजगारी हा मागील काही काळापासून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाचा विषय ठरत आहे. खरं तर नोकरी लागली तर जॉइन व्हायचं हा सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातील मुला-मुलींचा फंडा असतो. मात्र सगळ्यांचेच असे विचार अशातला भाग नाही. काहीजण लोकेशनमुळे, काहीजण पगारामुळे तर काहीजण प्रोफाइल मॅच न झाल्याने नोकरीला नकार देतात. मात्र एका मुलाने अगदी वेगळ्याच कारणासाठी नोकरीला नकार दिला असून या मुलाला तब्बल 1 कोटी रुपयांचं पॅकेज ऑफर करण्यात आलं होतं. हा तरुण अवघ्या 25 वर्षांचा असून त्याने ही नोकरी का नाकारली याची माहिती या तरुणाच्या मैत्रिणीने लिंक्डइन आणि एक्स पोस्टवरुन दिली आहे.
ऑफर नाकारण्यामागे एक विचित्र गोष्ट
14 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथील प्रॉडक्ट डिझायनर मुस्कान अत्तारने (Muskan Atar) तिच्या लिंक्डइन आणि एक्स पोस्टवर तिच्या एका मित्रासंदर्भात माहिती दिली. या मुलाने त्याला ऑफर करण्यात आलेली तब्बल एक कोटी रुपये वार्षिक पॅकेज असलेल्या नोकरीची ऑफर थेट नाकारली. विशेष म्हणजे उत्तम पोझिशन, चांगला पगार, चांगली ब्रँड असलेली कंपनी असूनही त्याने ही ऑफर नाकारण्यामागे एक विचित्र गोष्ट कारण ठरली.
नकार देण्याचं कारण काय?
ज्या ठिकाणी या तरुणाला नोकरीची ऑफर मिळाली त्या ऑफिसमध्ये फार नकारात्मक विचारांनी भरलेली लोक होते असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजेच टॉक्सिक अर्थात नकारात्मक कार्यालयीन वातावरणात मला काम करायचे नव्हते. माझ्यासाठी मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन उद्दिष्टं अधिक महत्त्वाची आहेत असं म्हणत या तरुणाने एवढ्या मोठ्या पगाराची ऑफर नाकारली.
नेमकं मुस्कानने काय म्हटलंय?
मुस्कानने यासंदर्भात आपल्या पोस्टमधून माहिती देताना, “माझ्या एका मित्राने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी एक कोटी रुपयांची नोकरीची ऑफर नाकारली, कारण त्याला नकारात्मक वातावरणात काम करायचे नव्हते. कौटुंबिक जबाबदाऱ्या, समवयस्क कर्मचाऱ्यांचा दबाव आणि स्वतःच्या जीवनशैलीसंदर्भातील आकांक्षांमुळे मी ही ऑफर स्वीकारली असती. पण त्याने त्याच्या दीर्घकालीन ध्येयांशी न जुळणाऱ्या गोष्टींना नकार देण्याचे धाडस दाखवले,” असं म्हटलं आहे.
