दिवसभर कर्तव्य बजावलं, रात्री कुटुंबासह जेवण अन् रात्री अचानक टोकाचं पाऊल, पोलीस अधिकाऱ्याने असं का केलं?

दिवसभराचे कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतले, कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि त्यानंतर काही वेळातच नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय पोलीस क्वार्टरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूर पोलीस आयुक्तालयातील अर्ज शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

कुटुंबियांसोबत जेवले, नंतर टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीचे कर्तव्य आटोपून ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असताना जेवणानंतर त्यांच्या पत्नी मुलांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. काही वेळाने पत्नी मुलांना झोपवून बाहेर आल्यानंतर त्यांना झोल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने झोल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्वार्टरची पाहणी करून आवश्यक पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासात घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे झोल यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

पोलीस ठाण्याक आकस्मिक मृत्यूची नोंद

कामाचा ताण, वैयक्तिक कारण अथवा अन्य कोणत्या परिस्थितीमुळे ते मानसिक तणावात होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव जालना जिल्ह्यातील मूळ गावी रवाना करण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबईत नौदलाच्या जवानाने जीवन संपवलं

नागपुरात पोलीस अधिकाऱ्याने जीवन संपल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत देखील अशीच काहीशी घटना समोर आली आहे. मुंबईत नौदल अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबासह जीवन संपवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या कुलाबा येथे नेव्ही नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या नौदल अधिकाऱ्याने आधी आपल्या पत्नी आणि दोन लेकरांना जेवणातून विषबाधा केली. यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *